अकोले : शेतीच्या व पैशाच्या कारणावरून दिराने दोन भावजयींचा कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना अकोले तालुक्यातील बेलापूर येथे काल सोमवारी घडली आहे. आरोपी दत्ता ऊर्फ बाप्पू प्रकाश फापाळे फरार झाला असल्याने पोलिसांची दोन पथके व एलसीबीची टीम आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहे. उज्वला अशोक फापाळे (वय ३०), वैशाली संदीप फापाळे (वय ३०) अशी घटनेतील मयत झालेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत अकोले पोलिसांत शहाजी रखमा शिंगोटे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी उज्वला अशोक फापाळे (वय ३०, रा. बेलापूर) ही सोमवार ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना घराच्या बाहेर तिचा दिर दत्ता फापाळे (वय ४५) याने शेतीच्या व पैशाच्या कारणावरुन भांडण करत असताना हिचा खुनच करतो, असे म्हणत रागात घरात जाऊन कोयता घेऊन येत तिच्या तोंडावर, डोक्यावर सपासप वार केले. यावेळी तिला सोडवण्यासाठी आलेली तिची जाऊ वैशाली संदीप फापाळे हिच्याही डोक्यावर, चेहऱ्यावर, हातावर वार केले. दोघीही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर निपचित पडल्या. या दोघींचा खून केल्यानंतर आरोपी दत्ता फापाळे हा कोयता हातात घेऊन घराच्या समोरील रस्त्याने निघून गेला. आरोपीवर गु. र. नं. ५०६/२०२४ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पसार झाला असल्याने अकोले पोलिस स्टेशनचे निरिक्षक मनोज बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दोन पथके व एलसीबीची टीम आरोपीचा शोध घेत आहेत.