-गणेश सुळ
केडगाव : नैतिकता ढासळलेल्या सध्याच्या आव्हानात्मक व प्रतिकूल काळात माणुसकी अन् प्रामाणिकपणाचा झरा आटत चालला आहे. मात्र, अशातही समाजात काही देव माणसे आहेत, की त्यांच्या निस्वार्थी बाण्यामुळे समाजाची बांधिलकी, चांगुलपणा टिकून आहे. याचे उत्तम उदाहरण दौंड तालुक्यातील खुटबाव येथे दिसून आले.
नुकतेच दौंड तालुक्याचे माझी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते खुटबाव या ठिकाणी विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला होता. त्यावेळी सरपंच गीता गणेश शितोळे यांचा दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण हरवले. उद्धघाटन झाल्यानंतर त्याजागेवरुन जाताना प्रकाश थोरात यांना सोन्याचं गंठण पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ते गंठण ताब्यात घेतले व सापडलेले सोन्याचे गंठण कोणाचे आहे, याची चौकशी सुरू केली.
याच ठिकाणी विविध विकास कामांचे भुमीपूजन लोकार्पण सोहळा पार असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या सर्व मित्रांना याबाबात माहिती दिली. त्याद्वारे त्यांना आपल्याच गावातील सरपंच गीता शितोळे यांचे गंठण हरविल्याची माहिती मिळाली. सापडलेले सोन्याचे गंठण शितोळे यांचे असल्याचे त्यांनी खात्री करून घेतले आणि सरपंच शितोळे यांच्याकडे तो सुपूर्त केला.
आजच्या काळात रस्त्यावर सापडलेले रुपयाचे नाणेही माणूस जपून ठेवतो प्रकाश थोरात यांनी दाखविलेल्या मनाच्या मोठेपणामुळे शितोळे यांचा सौभाग्य अलंकार परत मिळाला. यामुळे थोरात यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामपंचायत खुटबाव यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन प्रकाश थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच निखिल थोरात, ग्रामसेवक राऊत भाऊसाहेब, चेतन थोरात, दत्तात्रय थोरात, नरेंद्र भागवत, संतोष थोरात, फौजी दत्तात्रय शेलार, महेश शेलार आदी उपस्थित होते.