भिगवण : मदनवाडी (ता. इंदापूर) येथील २२ वर्षीय शरयूकुमार शरद चितारे या युवकाचे हृदयाच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. शरयू हा कंदर (ता. करमाळा) येथील त्याच्या मामाच्या गावी गेला होता. शनिवारी (दि. ५) पहाटे पाचच्या सुमारास त्याला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर हृदयाचा तीव्र धक्का बसला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले.
पुण्यातील सीओईपी या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शरयूकुमार तृतीय वर्षाच्या वर्गात शिकत होता. त्याचप्रमाणे त्याने यूपीएससी परीक्षेचीदेखील तयारी सुरू केली होती. शांत, संयमी, त्याचप्रमाणे चांगला शरीरयष्टी असलेला शरयू गेल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शरद चितारे यांचा तो पुत्र होता.