मुंबई : बदलापूर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी शाळेच्या दोन मुख्य ट्रस्टींना बुधवारी रात्री अटक केल्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, दोनच दिवसांत न्यायालयाकडून दोन्ही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनाही 25 हजारांच्या जात मुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे पडसाद राज्यभर उमटले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे प्रकरण तातडीने शाळेच्या ट्रस्टींना सांगितले होते, परंतु ट्रस्टींनी वेळेवर कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यावर शाळेच्या दोन प्रमुख ट्रस्टींना अटक झाली नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत होता.
बदलापूर अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापल्यानंतर पोलिसांनी बुधवारी शाळेच्या संस्थाचालकांना अटक केली होती. मात्र, आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. बदलापूर बाल लैंगिक अत्याचार व अक्षय शिंदे प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींची सुटका झाली आहे.
दरम्यान, याप्रकरणी तिन्ही आरोपींची आज कायदेशीर सुटका झाली आहे. याप्ररणी दाखल दोन्ही गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सेम सेक्शन असल्यामळे आज जास्त युक्तिवाद न करता, काल गुरुवारच्या जामीनाच्या निर्णयाप्रमाणे न्यायालयाकडून आज दोघांनाही जामीन मिळाला आहे.