लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मजुरांना कामावर घेऊन जाणाऱ्या रिक्षाने समोरून येणाऱ्या टू व्हीलर मोटरसायकलला वाचवण्याच्या नादात सिमेंट मिक्सरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना मांजरी ग्रीन समोरील सिग्नल चौकात गुरुवारी (ता.3) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
नन्हे चव्हाण (वय अंदाजे 35, रा. कुशीनगर उत्तर प्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर विष्णू प्रताप सिंह (वय 38, धंदा बांधकाम मजूर रा. मुक्काम पोस्ट बजाज थाना बैगह जिल्हा पश्चिम चंपारण्य), पद्युमन नरसिंह राज (वय 26, धंदा-बिगारी), रवींद्र चव्हाण (वय 43, रा. बेतिया बिहार), सुनील संतोष पुराहा (वय 20, मूळ पत्ता शिवांगी बिहार), बेचू चव्हाण (वय 45) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनिसार, मजुरांना कामावर घेऊन जाणारा रिक्षा 15 नंबर वरून शेवाळवाडी गावाकडे पुणे सोलापूर महामार्गावरून चालला होता. रिक्षा मांजरी ग्रीन येथील सिद्धिविनायक पेट्रोल पंपांच्या चौकात आली असता, रिक्षा चालकाने सिग्नलचा नियम न पाळता सिग्नल जंप करून पुढे निघत होता. तेव्हा समोरून येणाऱ्या टू व्हीलर मोटरसायकलला वाचवण्याच्या नादात त्याची रिक्षा सोलापूर कडून पुण्याच्या दिशेकडे जाणाऱ्या येका सिमेंट मिक्सर च्या मागच्या चाकाला जाऊन धडकली.
या अपघातात कामगार नन्हे चव्हाण हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर विष्णू प्रताप सिंह हा गंभीर जखमी झाला असून त्याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर उरलेल्या सर्व जखमी कामगारांवर ससून हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.