बारामती : अवघ्या सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील नवरदेवाचा गुरुवारी (ता. २४) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. या घटनेमुळे बारामतीसह परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
सचिन उर्फ बबलू अनिल येळे ( वय २५ रा. माळेगाव, ता. बारामती) असे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. अवघ्या सहा दिवसातच लग्नाच्या निमित्ताने घरासमोर उभारलेल्या मंडपातच नवरा मुलगा सचिनचा मृतदेह ठेवण्याची वेळ त्याच्या कुटुंबियांवर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव साखर कारखान्याचे कर्मचारी अनिल येळे (रा. माळेगाव-येळेवस्ती) यांचा तिसरा मुलगा सचिन येळे यांचा विवाह परभणी येथील हर्षदा हिच्याशी शनिवारी (ता.१९) शारदानगरच्या अनुज गार्डनमध्ये मोठ्या उत्साहात झाला. त्यानंतर या वधूवरांनी रविवार व सोमवारी देवदर्शन केले आणि त्यांची सत्यनारायणाची पुजा मंगळवार रोजी झाली.
बुधवारी (ता. २३) मध्यरात्री सचिन याला हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. नातेवाईकांनी त्याला तातडीने वैद्यकिय उपचारासाठी बारामती शहरात नेले, परंतु उपचारापुर्वीच सचिनची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार गुरवारी पहाटे या दुर्घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि माळेगावसह परिसरात अनेकांना धक्का बसला. नातेवाईकांसह माळेगावकरांनी मयत सचिनच्या अंतविधीला मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, पती सचिन हा आयुष्यातून अचानकपणे गेल्याने परभणी जिल्ह्यातून आलेली नववधू हर्षदा हिची मानसिक अवस्था तर खूपच वेदनादायी झाली आहे. मयत सचिनच्या आई-वडीलांसह नातेवाईकांचा लग्न मंडपातील आक्रोश अक्षरशः उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. या दुखःत घटनेने माळेगाव परिसरात कमालिची शोककळा पसरली असून एकच हळहळ व्यक्त होत आहे.