अमरावती : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या कारवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल, सोमवार (दि. 30 सप्टेंबरच्या) मध्यरात्रीच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील वलगाव ते दर्यापूर मार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेने अमरावती जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष गोपाल अरबट हे दर्यापूर येथील मूळ रहिवासी आहेत. अरबट हे अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी धावत्या कारवर म्हणजे त्यांच्या इनोव्हा गाडीवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. तरी अचानक करण्यात आलेल्या या गोळीबारामुळे अमरावती जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे.
या घटनेनंतर गोपाल अरबट यांनी तातडीने पोलीसांत धाव घेत घटनेसंदर्भात माहिती दिली. हा गोळीबार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरुन झाला आहे, असा आरोप गोपाल अरबट यांनी केला.
मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा गाडीवर तीन राउंड फायर करण्यात आले आहे. वलगाव पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार केली असून, या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.