विशाल कदम
लोणी काळभोर : जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. हे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील बांधकाम व्यावसायिक किरण चव्हाण यांचे चिरंजीव सुमित चव्हाण यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील सुमित किरण चव्हाण यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षकाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात राज्यात ४१ वे स्थान प्राप्त करून गरुडझेप घेतली आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले मुली लाखो रुपये भरून क्लास लावतात. परंतु सुमित चव्हाण यांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता घरीच अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यांच्या या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे.
सुमित चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कवडी माळवाडी (कदमवाकवस्ती) येथे झाले असून माध्यमिक शिक्षण लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातून कला शाखेतून अर्थशास्त्र विषयातून उच्च पदवी प्राप्त केली.
दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाच्या पुत्राने राज्य कर निरीक्षकाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. तसेच अपयशाने खचून न जाता अभ्यासाला परिश्रमाची जोड दिल्यास यशाचे शिखर गाठता येते हे सुमित चव्हाण यांनी दाखवून दिले आहे. परिस्थिती नसताना सुमित चव्हाण यांनी यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
पुणे प्राईम न्यूजशी बोलताना सुमित चव्हाण यांनी सांगितले की, आईवडील, भाऊ, शिक्षक, मित्रांनी मार्गदर्शन केल्याने हे यश मिळाले आहे. हे यश भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वडील किरण चव्हाण, आई निशा चव्हाण, भाऊ अमित चव्हाण वहिनी नंदिनी यांच्या चरणी अर्पण करीत आहे. तसेच हे यश मिळवण्यासाठी हडपसर येथील अग्निशामक दलामध्ये कार्यरत असलेले मोठे बंधू बाबासाहेब चव्हाण यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले आहे.