योगेश मारणे
न्हावरे : न्हावरे (ता. शिरूर) येथील रविवारी आठवडे बाजारात भाद्रपद अमावस्येच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. ०१) साजरा होणाऱ्या बैलपोळ्या निमित्त परिसरातील बळीराजाने बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य (साज) खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. भाद्रपद बैलपोळ्याचा सण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात म्हणजे दक्षिण पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा होत असतो.
या दिवशी शेतकरी आपल्या शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलाची मनोभावे पूजा करून त्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढतो व गोडधोड नैवेद्य त्याला खाऊ घालत असतो. शेतात राबणाऱ्या बैला प्रती आदराची व कृतज्ञतेची भावना म्हणून हा सण दक्षिण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. भाद्रपद आमावस्येला येणारा बैलपोळा हा सण शेतकरी वर्गात महत्वाचा समजला जातो. मात्र, अलीकडच्या युगात बैल जोडीने शेती करण्याऐवजी ट्रॅक्टरने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
त्यामुळे पिढीजात शेतकरी असलेले शेतकरी सुद्धा बैलांची जोपासना करताना दिसत नाहीत. त्याऐवजी शेतीसाठी ट्रॅक्टरच्या अती वापरामुळे बैलांची संख्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे, असे जानकार बैल प्रेमी शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.