संतोष पवार
पळसदेव, (पुणे) : हवामान बदलासारख्या आव्हानांमध्ये तरुणांना पर्यावरणाशी जोडण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा उपक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सुरू केला आहे. ज्यामध्ये पदवीचे शिक्षण घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्याला, मग तो अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापनाचा अभ्यास करणारा विद्यार्थी असो, की आणखी कोणत्याही विद्याशाखेचा त्याला आता पर्यावरण शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. त्यासंदर्भात युजीसीने विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत. ज्यामध्ये त्यांना पर्यावरणाशी संबंधित धोक्यांची जाणीव करून दिली जाणार असून पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्यास शिकवले जाणार आहे.
हा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना चार अतिरिक्त क्रेडिट पॉइंट देखील देण्यात येणार आहेत. जे अभ्यासानंतर मिळालेल्या गुणांच्या यादीत किंवा पदवीमध्ये नोंदवले जाणार आहेत. युजीसीने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पत्र लिहून पदव्युत्तर स्तरावर शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक शिक्षण अनिवार्यपणे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आयोगाने पदवी स्तरासाठी तयार केलेला पर्यावरण शिक्षणाचा अभ्यासक्रमही प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये मानव आणि पर्यावरण यांच्यातील समन्वय, पर्यावरणाशी संबंधित स्थानिक समस्या, प्रदूषण आणि त्याचे धोके, त्यासंबंधीचे कायदे आदी विषय ठेवण्यात आले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनिवार्य म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी संबंधित शिक्षण देण्याच्या पुढाकारानंतर आयोगाने हा अभ्यासक्रम तयार केला होता.
या अंतर्गत तयार केलेल्या क्रेडिट फ्रेमवर्कमध्ये विद्यार्थ्यांना एका क्रेडिट पॉइंटसाठी किमान 30 तास अभ्यास करावा लागेल. अशा परिस्थितीत, चार क्रेडिट पॉइंट्ससाठी, विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या कालावधीत किमान 160 तास पर्यावरणाशी संबंधित अभ्यास करावा लागेल. यामध्ये प्रॅक्टिकलचाही समावेश आहे.