पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव भागात अफू विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ५६ लाख ९० हजार रुपयांची दोन किलो ८४५ ग्रॅम अफू जप्त करण्यात आली आहे. देवीलाल शंकरलाल अहिर (वय-४२, रा. कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव भागात एक जण अफू विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी योगेश मांढरे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या देवीलाल अहिरला पोलिसांनी पकडले.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये अफू आढळून आली. पोलिसांच्या पथकाने ५६ लाख ९० हजार रुपयांची दोन किलो ८४५ ग्रॅम अफू तसेच दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त केला आहे. अहिरने अफू कोठून आणली, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर यांनी केली.