थेऊर : थेऊर (ता. हवेली) येथील प्रगतशील शेतकरी विजय एकनाथ कुंजीर यांना महाराष्ट्र सरकारकडून जाहीर झालेला वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आज मुंबई येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही राधा, संचालक कृषी नायकवडी तसेच इतर प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
हवेली तालुक्याला विजय कुंजीर यांच्यारुपाने पहिल्यांदाच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यामुळे हवेली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. फेब्रुवारी २०२४ रोजी शासनाकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.
विजय कुंजीर यांचे वडील एकनाथ कुंजीर हे देखील प्रगतशील शेतकरी आहेत. विजय कुंजीर यांनीही उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पॉलिहाऊस मधील ऑर्चिड, अँथोरियम, फिनोलॉपसिस या हायटेक फुलशेतीकडे वळत फुलांची झाडांची आयात निर्यात करून जिल्ह्यात चांगला नावलौकिक केला आहे. आज पुरस्कार मिळाल्यानंतर विजय कुंजीर व त्यांच्या परिवाराने आनंद व्यक्त केला. कुंजीर यांच्या निवडीने थेऊर व परिसरातील शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्शवत काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना तालुका पंचायत समितीच्या शिफारसीने पुणे जिल्हा परिषदकडूनही विजय कुंजीर यांना २०२१ साली “कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार” देण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रगतशील शेतकरी विजय कुंजीर म्हणाले, शेतकरी भविष्यात हायटेक शेतीकडे वळाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्तीकडे वाटचाल होऊन, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील, यासाठी पुढील काळात हायटेक शेती करणारे शेतकरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
मुंबई येथे पुरस्कार स्वीकारते वेळी विजय कुंजीर यांचे कुटुंबिय, थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, वैभव बडदे, प्रतीक कंद, आप्पासाहेब उंद्रे, विकास नागे, पृथ्वीराज काकडे, हर्षद शिंदे, प्रशांत शिंदे, संभाजी नायकवडे, वैभव लवांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
याबाबत पुणे प्राईम न्यूजशी बोलताना विजय कुंजीर म्हणाले की, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. शेतात विविध पिके घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य विस्तार व प्रशिक्षणाचे संचालक विनय आवटे, पुण्याचे विभागीय कृषी सहसंचालक सुनील बोरकर, कृषी सहसंभोदक रफिक नाईकवाडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तंत्र अधिकारी राजेंद्र डूमरे, उपविभागीय कृषी अधिकारी सूरज मडके, हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, हडपसर मंडळ कृषी अधिकारी गुलाबराव कडलक, कृषी परवेक्षक रामदास डावकर, थेऊरचे कृषी सहाय्यक राजेंद्र भोसेकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन व योगदान मिळाले. त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो.