नागपूर : नागपूर येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे. गद्दारांना 50 खोके आणि आम्हाला 1500 रुपये असं महिला सांगतात. 2014 ला मोदी यांचा आम्ही प्रचार करत होतो. 15 लाख देणार होते. त्याचे 1500 का झाले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
लोकसभा जिंकली, आता विधानसभा जिंकायची आहे. लोकं मेली तरी चालेल, पण यांना सत्ता हवी आहे. मीडियाला काम करु द्या, त्यांच्यामुळे दिल्लीचे ठग आपल्याला ऐकतील. अजूनही निवडणूक वातावरण तापलं नाही. जेव्हा पेटेल तेव्हा विझवायला वेळ लागेल. फटाके फोडायला दिवाळी अजून बाकी आहे. रामटेक आपण पाच वेळा जिंकलो. पण महाविकास आघाडी म्हणून कदरायचं नाही. बाबासाहेब केदार यांना भेटलो होतो. तेव्हा सुनील केदार अपक्ष होते.
तेव्हापासून सुनील केदार आमचा सहकारी आहे. रामटेक मागितली, रामटेक दिली. शिवसैनिकांनी काम केलं. रश्मीताईंचा अर्ज बाद झाला. तेव्हा सुनील केदार म्हणाले चिंता करु नका. तेव्हा प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय अवैध होता असं कोर्टाने म्हटलं. आता गुन्हेगार कोण? त्यावरून प्रमाणपत्र घेतो का? ज्यांनी रश्मी बर्वेचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.