पुणे : सप्टेंबर महिना संपण्यास दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. तर अशातच आता 1 ऑक्टोबरपासून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. एलपीजी गॅस, आयकर ते आधार कार्डमध्ये अनेक बदल होऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार की दिलासा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
एलपीजी सिलिंडरची किंमत
ऑईल मार्केटींग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करतात. त्याप्रमाणे 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सुधारित किंमती जाहीर केल्या जाऊ शकतात. अलीकडच्या काळात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमतीत बदल झाले असताना, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.
HDFC बॅंकचे क्रेडिट कार्ड
जर तुम्हीही एचडीएफसी बँकचे ग्राहक असाल तर लक्षात घ्या की, काही क्रडिट कार्ड्ससाठी लॉयल्टी प्रोग्राममध्ये बदल करण्यात आला आहे. हे नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. एवढंच नाही तर एचडीएफसी बँकने स्मार्टबाय प्लॅटफॉर्मवर अॅपलच्या प्रॉडक्टवर खास रिवॉर्ड पॉईंटच्या रिडम्पशनमध्ये वाढ केली असल्याचे सांगितले जात आहे.
पोस्ट ऑफिस खात्यावरील व्याज दर
पोस्ट ऑफिस खात्यावरील व्याजदरही 1 ऑक्टोबरपासून बदलणार आहेत. नॅशनल स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम खात्यांवरील व्याजदरातील बदल तुमच्या व्याज उत्पन्नावर परिणाम करू शकतात.
सीएनजी आणि पीएनजीचे दर
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMCs) ATF, CNG आणि PNG चे दर बदलतात. सप्टेंबरमध्ये एटीएफच्या दरात कपात करण्यात आली होती.
सुकन्या समृद्धी योजना
खास मुलींसाठी सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजने संबंधीतही एक मोठा बदल होणार आहे. या अंतर्गत, पहिल्या तारखेपासून केवळ मुलींचे कायदेशीर पालकच त्याचे हे अकाउंट वापरू शकतात. नवीन नियमानुसार, जर एखाद्या मुलीचे SSY खाते कोणी अशा व्यक्तीने उघडले जो तिचा कायदेशीर पालक नाही, तर तिला हे अकाउंट आपल्या कायदेशीर पालकांकडे हस्तांतरित करावे लागेल. कारण तसे न केल्यास ते खाते बंद केले जाऊ शकते.
पीपीएफ खातं
पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) योजनेत तीन मोठे बदल होणार आहेत. हा बदल 1 ऑक्टोबर 2024 पासून म्हणजेच पुढील महिन्यापासून लागू होणार आहे. 21 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागानं नवीन नियमांसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वं जारी केली, ज्याअंतर्गत पीपीएफचे तीन नवीन नियम लागू केले जातील. याअंतर्गत एकापेक्षा अधिक खाती असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसंच अशा अनियमित खात्यावरील पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटचं व्याज व्यक्ती खातं उघडण्यास पात्र होईपर्यंत भरलं जाईल. म्हणजेच व्यक्तीचे वय 18 वर्षे झाल्यानंतरच पीपीएफचा व्याजदर दिला जाईल.
लहान बचत योजनांचे नियम
वित्त मंत्रालयाने राष्ट्रीय लघु बचत योजना अंतर्गत चुकीच्या पद्धतीने उघडलेल्या खात्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता PPF आणि सुकन्या समृद्धी सारखी खाती वित्त मंत्रालयाकडून नियमित केली जातील. यामुळे भविष्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही.