पुणे : मृत्यूचा सापळा बनलेल्या नवले पुलावर सातत्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये ट्रकने ४८ गाडयांना धडक दिली. त्यानंतर त्याच रात्री देखील पुन्हा दोन अपघात झाले. सोमवारी देखील अपघातांची मालिका सुरूच राहिली. त्यामुळे प्रवासी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व त्याबरोबरीने प्रशासानाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी राष्ट्रवादीचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या वतीने “सावधान, पुढे नवले पूल आहे” अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.
या फ्लेक्सवर तीव्र स्वरूपाचा उतार आणि त्याबरोबरीने कावळ्याचा देखील फोटो लावण्यात आला आहे. यावर ‘सावधान… पुढे नवले ब्रीज आहे’ अशी रचना केली असून जांभुळवाडी तलावापासून ते नऱ्हे येथील सेल्फी पॉईंट पर्यंत हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे येथील नागरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चर्चेला सुरुवात झाली आहे.
कात्रज बोगद्यापासून ते थेट नवले पुलापर्यंत तीव्र स्वरूपाचा उतार आहे. याचा फायदा घेण्यासाठी आणि इंधनाची बचत करण्यासाठी मोठ्या वाहनांचे चालक गाडी न्यूट्रल करतात. किमान हा ६ किमीचा पट्टा असल्याने वाहनाला देखील अपेक्षित वेग मिळालो. मात्र, हीच इंधनाची बचत अनेकांच्या जीवावर बेतली आहे. यासाठीच भूपेंद्र मोरे यांच्याकडून असे फलक लावण्यात आले आहेत.
याविषयी बोलताना भूपेंद्र मोरे म्हणाले, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाशी यापूर्वी देखील आम्ही उपाय योजना करण्यासाठी सातत्याने भांडत आहोत. मात्र, ढिम्म प्रशासनाला केवळ अपघात झाल्यांनंतरच जाग येते. याच्या झोपेच्या सोगेमुळे मागील दहा वर्षांच्या (२०१२-२०२२) कालावधीत आतापर्यंत सुमारे ९३ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. किमान या फ्लेक्समुळे तरी वाहनचालक सतर्क होतील व प्रशासन देखील थोडे जागे होईल, याच उद्देशाने हे फलक लावण्यात आले आहेत.