पुणे : हडपसर परिसरातील मगरपट्टा सिटीत राहणाऱ्या ५४ वर्षीय आयटी अभियंता महिलेचे फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुमच्या नावाने मुंबई ते शांघाई पार्सल पाठविले जात असून त्यामध्ये एटीएम कार्ड, ड्रग्स सापडले आहेत. तुमचे पैसे सरकारच्या सुरक्षा खात्यात पाठवून तपासायचे असल्याचे सांगून महिलेची तब्बल ३ कोटी ५६ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी मगरपट्टा सिटीत राहणाऱ्या ५४ वर्षीय महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध फसवणूकीसह आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ जून ते १५ सप्टेंबर २०२४ या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या एका आयटी कंपनीत अभियंता आहेत. सध्या त्या घरुनच काम करतात. सायबर चोरट्याने तक्रारदार यांना सपर्क करुन आधी डीएचएल कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिस आणि सीबीआय मधुन बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाने मुंबई ते शांघाई पार्सल पाठविले जात आहे.
त्यामध्ये मोठ्या प्रमाणात एटीएम कार्ड, एक लॅपटॉप, ४ किलो कपडे, एमडीएमए ड्रग्स सापडले असल्याचे सांगितले. तसेच तुमचा आधारकार्ड नंबरवर मनी लॉड्रिंग, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे तुम्हाला अटक केली जाईल असं सांगितले. त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरील पैसे सरकारी सुरक्षा खात्यावर पाठवून तपासायचे असल्याचे सांगून महिलेची ३ कोटी ५६ लाख ७५ हजारांची फसवणूक केली. आयटी अभियंता महिलेने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.