घाटनांद्रा : येथील एका तरुणाचे पाच दिवसांपूर्वी अपहरण करून खंडणीची मागणी करत त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. खून झालेल्या तरुणाचे नाव कैलास नामदेव मोरे (३५, रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) तर आरोपीचे नाव संजय राजेंद्र मोरे (रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) असे आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व सिल्लोड पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, घाटनांद्रा येथील निवृत्त माजी सैनिक नामदेव भुरकाजी मोरे यांचा मुलगा कैलास नामदेव मोरे (३५) हा शनिवार (दि.२१) पासून घरात काहीही न सांगता सकाळी ९ वाजेपासून हरवल्याची तक्रार वडील नामदेव मोरे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. कैलास हा तरुण सापडत नसल्याने पोलिसांची शोधमोहीम सुरू असताना मयताच्याच मोबाईल क्रमांकावरून मयत कैलासचा भाचा जीवन ज्ञानेश्वर निकम (रा. सावरगाव) यांच्या मोबाईलवर तीस लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. याबाबत सोमवार (दि.२३) रोजी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यावरून सिल्लोड पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांनी तातडीने कार्यवाही करत आरोपीचा माग काढला.
अपहरण झालेल्या तरुणाच्या नातेवाईक आणि मित्रांकडे विचारपूस व चौकशी केली. तसेच मयत कैलासचा मोबाईल आणि मिळालेल्या गोपनीय माहितीवरून घाटनांद्रा येथील आरोपी संजय राजेंद्र मोरे याने शनिवारी (दि. २१) सकाळच्या सुमारास अपहरण झालेल्या कैलास मोरे या तरुणाला त्याने ठोक्याने घेतलेल्या शेतीत घेऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित संजय राजेंद्र मोरे याच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. पोलिसी खाक्या दाखवताच संजयने गुन्ह्याची कबुली दिली.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनाय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सिल्लोड ग्रामीण पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस अमलदार सचिन सोनार, नामदेव शिरसाट, रवींद्र लोखंडे, विठ्ठल ढोके, वाल्मीक निकम, दीपक सुराशे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय काकडे, ज्ञानदेव ढाकणे, आमठाणा बीट जमादार, अनंत जोशी यांनी केली.
अशा प्रकारे केला खून:
संजय यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता आरोपीने सांगितले की, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा छंद होता. त्याच्यावर क्रेडिट कार्डचे कर्ज झाले होते. तसेच त्याने खासगी लोकांकडून सुद्धा उसने पैसे घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते. तोटा झाल्याने तो कर्जबाजारी झाला होता. दरम्यान, त्याने पैशाची मागणी केली, मात्र कैलासने पैसे देण्यास नकार दिला. त्याठिकाणी त्यांचा वाद झाल्याने आरोपी संजयने कैलासचा तारेच्या साह्याने गळा आवळून ठार मारले. त्याचे प्रेत दिवसा मकाच्या शेतामध्ये ठेवले. त्यानंतर आरोपी संजयने घरी जाऊन परत रात्रीच्या सुमारास शेतात येऊन बांधावर खड्डा खोदत मयत कैलासला पुरले. यानंतर मयत कैलास याच्या घरी येऊन काही घटना घडली नसल्याचे ढोंग करत वागू लागला.
आरोपी संजय मोरे हा मयत कैलासचा चुलत साडू आहे. आरोपी संजय याने कर्जाचे पैसे फेडण्यासाठी मयत कैलास मोरे याच्या मोबाईलवरून त्याच्या नातेवाइकांना संदेशाद्वारे ‘अपहरण झालेला कैलास मोरे हा माझ्या ताब्यात आहे, मला पैसे द्या’ अशी मागणी व्हॉट्सअॅपद्वारे केली. ‘तुम ३० लाख रुपये तयार रखो, वरना उसकी लाश भी नही मिलेगी’ अशा प्रकारचा संदेश वारंवार व्हॉट्सअॅपवर पाठवत खंडणीची मागणी आरोपी संजयने केली.