नवी दिल्ली : जागतिक बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. राजधानी दिल्लीत बुधवारी सोन्याचा भाव 900 रुपयांनी वाढून 77,850 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला. मंगळवारी 99.9 टक्के शुद्धता असलेले सोने 76,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचल्याचे पाहिला मिळाले.
‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या मते, येत्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस $3,200 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सोन्याची वाढ सुरूच आहे आणि फ्युचर्स मार्केटमध्ये त्याच्या किमती पुन्हा एकदा 76,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत. तर चांदीचा भाव 3,000 रुपयांनी वाढून 93,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. गेल्या सत्रात चांदी 90 हजार रुपये प्रतिकिलोवर होती.
याशिवाय 99.5 टक्के शुद्धतेचे सोनेही 900 रुपयांनी वाढून 77,500 रुपये प्रति 10 ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले. गेल्या सत्रात सोन्याचा भाव 76,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 75,420 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने वाढल्याचे दिसत आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 69,810 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 92,500 रुपयांवर गेले आहेत.