संदीप टूले
केडगाव: दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या विशेष प्रयत्नांनी दौंड तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला आहे. त्या लाभार्थ्यांचा स्वप्नपूर्ती सोहळा आज (दि. २६) पिंपळगाव येथे पार पडला. या सोहळ्यासाठी लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. एक हजार घरांची बांधणी सुरु आहे. ६०० घरांचा पहिला, दुसरा आणि तिसरा हफ्ता मिळाला आहे. पुढील दीड हजार घरांचा डीपीआर शासन स्तरावर प्रलंबित असून तेही काम लवकरच सुरु होईल, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
आमदार राहुल कुल यांनी सांगितले की, २०१८-१९ ला ही योजना फसवी आहे, असं विरोधकांकडून सांगितलं जायचं. निवडणुकीच्यावेळी त्याचे भांडवल केले जात होते. मात्र, तरीही आपण लोकांनी आमच्या बोलण्यावर विश्वास टाकला. प्राधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वात जास्त लाभार्थ्यांनी घरकुलांचा लाभ घेतला.
कुल पुढे बोलताना म्हणाले, जे बांधकाम कर्मचारी, मजूर आहेत त्यांना या अडीच लाख रुपयांच्या बांधकामाव्यतिरिक्त आणखी २ लाख रुपये मिळतील. या लोकांना एकूण साडेचार लाख रुपये मिळावेत, असा आम्ही प्रयत्न करत आहोत, असं देखील आमदार राहुल कुल म्हणाले.