संतोष पवार
पुणे: महावितरण भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार कनिष्ठ सहाय्यक लेखा पदाची परीक्षा ही 16, 17 व 18 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. पदवीधर शिकावू अभियंता (स्थापत्य) साठी 21 ऑक्टोबर रोजी तर, पदविका धारक शिकाऊ उमेदवार स्थापत्य व विद्युतची परीक्षा ही अनुक्रमे 22 व 23 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. विद्युत सहाय्यक परीक्षेचे वेळापत्रक हे स्वतंत्र पद्धतीने जाहीर केले जाईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत नमूद पदे भरण्यासाठी २९ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. तसेच त्यांना विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात आलेली होती. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. जाहिरातीस अनुसरून विविध पदाच्या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारीत घेण्यात येणार आहेत.
संगणक प्रणालीवर आधारीत परीक्षांची कार्यपध्दत, परीक्षेचे ठिकाण, प्रवेश प्रमाणपत्र इत्यादी परीक्षेपूर्वी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांनी कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in वर वेळोवेळी भेट देऊन माहिती तपासावी, अशी विनंती करण्यात आली आहे. जाहिरात प्रसिद्ध केलेल्या “विद्युत सहाय्यक” पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या प्रसिध्द केले जाईल. संवर्गाच्या मूळ जाहिराती तसेच त्यानुषंगाने प्रसिध्द केलेल्या शुध्दिपत्रकातील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असे, महावितरण कंपनीने प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे.