उरुळी कांचन : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आशीर्वादाने व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण, पावसाचे पाणी जाण्यासाठी कचऱ्याने जाम झालेले चेंबर यामुळे हा महामार्ग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. बुधवारी (ता. 25) पावसाच्या पाण्याने संपूर्ण रस्ता जलमय झाला होता. महामार्ग प्राधिकरणच्या मनमानी कारभारामुळे पाण्यातून वाट काढत शाळकरी मुले, व्यावसायिक, नागरिक, व वाहनचालकांना कसरत करावी लागली.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अंतर्गत असलेल्या महामार्गावर जोपर्यंत टोल वसुली सुरु होती त्यावेळीही रस्त्याची डागडुजी एजन्सी रडत रडतच करत होती. आतातर शासनाच्या अधिकाऱ्यांना तो राष्ट्रीय महामार्ग आहे याचाच विसर पडला आहे, कोणतीही दुरुस्ती व नैमित्तिक देखभाल करुन रस्ता सुस्थितीत ठेवणे आपले कर्तव्य आहे हे ते विसरले आहेत. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्ग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. महामार्गावर पाणी निचरा होत नसल्याने व्यावसायिकांचे, शाळेतील विद्यार्थी, व वाहनचालकांना पावसाच्या पाण्यामुळे हाल होत आहेत. रस्त्याच्या बाजूस असलेल्या व्यावसायिकांनी मुरूम भरल्यामुळे पाणी सेवा रस्त्यावर येऊन साठून तसेच राहत आहे. त्यामुळे वाहन चालक अपघात ग्रस्त होत आहेत.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इरीगेशन कॉलनी, चौधरी माथा, हरणा कॉम्प्लेक्स समोर व उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या परिसरात पाणी साचून राहत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहतुकीच्या गैरसोयी बाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या ठिकाणी अपघाताची मालिका सुरु आहे. त्यामुळे या परिसरातून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.
पुणे- सोलापुर महामार्गवरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट ते कासुर्डी (ता. दौंड) या दरम्यानचा रस्ता “बाधा, वापरा व हस्तातंरीत करा (बिओटी)” या तत्वानुसार आयआरबी या खाजगी कंपनीने विकसीत केला होता. मात्र मुदत संपल्याने चार वर्षापुर्वी आयआरबी कंपनीने वरील रस्ता शासनाकडे हस्तातंरीत केला.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गटरलाईन बंद असल्यामुळे पावसाचे पाणी साठून राहण्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या पाण्यातून धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याची तक्रार वाहनचालक करू लागले आहेत.
याबाबत उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन म्हणाले, “मागील वीस वर्षात रस्त्याच्या कडेची बांधकामे वरती आली पण रस्ते जागेवर राहिले. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानदारांनी मुरूमीकरण केल्याने सेवा रस्त्यावरील पाणी तुंबून राहत आहे. याचा त्रास सर्वाना सहन करावा लागतआहे. महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला तसेच समक्ष भेट घेतली मात्र अधिकारी सहकार्य करीत नाहीत.”
उरुळी कांचन येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय बंटी कांचन म्हणाले, “ग्रामपंचायतने पावसाळा पूर्वी ड्रेनेज स्वच्छ केल्या पाहिजेत. ड्रेनेज या कचऱ्याने जाम झाल्या आहेत. त्यामुळे पाणी जात नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर येते. या ठिकाणची गटारलाईन साफ करुन व चेंबर मोकळे करून पाणी वाहून जाण्याकरिता चेंबर खुले करून साफसफाई करावी.”
याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे (एनएचएआयचे) प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
याबाबत बोलताना भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष कमलेश काळभोर म्हणाले, “पुणे – सोलापूर हायवे न राहता थर्ड क्लास रोडझाला आहे. रस्त्याला मोठ मोठ्या चाकाऱ्या पडल्या आहेत. त्यामध्ये पाणी साचून अपघात होत आहेत. पावसाळा पूर्वीची कामे केली जात नाहीत. याचा परीणाम निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. सध्या रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत. याचे कोणत्याही नेत्यांना काहीही घेणे देणे नाही.