पुणे : भरदिवसा बंद घराची घरफोडी करून चोरी करणारी सराईत आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात आली आहे. घरामध्ये दिवसा घरफोडी करून केलेले १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस यांनी ही कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण जिल्हयात बंद घरामध्ये दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल झाल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण, यांनी विशेष लक्ष देवून गुन्हयांची कार्यपद्धती, घटनास्थळ, वेळ याबाबत पडताळणी करण्याच्या सुचना करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची चार तपास पथके तयार करण्यात आली होती.
नारायणगाव पो स्टे गु.र.नं. २५९/२०२४ भा.न्या.सं. ३३१ (३), ३०५ या गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना, अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले यांनी पाटेमळा येथील घटनास्थळी भेट दिल्यानंतर स्थानिक व्यक्तीकडून प्राप्त माहितीच्या आधारे घटनास्थळापासून काही किमी अंतरावर संशयित दुचाकीवर तीन-चार इसम हे पाटेमळा येथील घटनास्थळाकडून कल्याण-नगर हायवे रोडकडे जाताना दिसले आहेत. अशी माहिती मिळाली होती.
त्या अनुषंगाने पथकाने मोटार सायकलचा माग काढत सुमारे १२० किमी पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत नगर एमआयडीसी पर्यंत अखेर संशयित आरोपींचा माग काढला, उपलब्ध फुटेजच्या आधारे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळवून गुन्हयाच्या कामी आरोपी गणेश गोवर्धन काळे (वय २४ वर्षे), मिलींद ईश्वर भोसले यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी इतर दोन साथीदारांचे मदतीने गुन्हा केला असून त्यापैकी एक अल्पवयीन असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे सराईत असल्याने त्यांना विश्वासात घेवून विचापूस करण्यात आली. त्यांनी दिवसा घरफोडी करून चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे दागिने हे त्यांच्या आई वडीलांचे आहेत व त्यांना औषधोपचारासाठी पैशाची गरज आहे. असे सोनार व्यावसायिकाला सांगून त्याचेकडे सोन्याचे दागिने तारण ठेवले असल्याचेही सांगितले.
सदर सोनार व्यावसायिकाकडून सुमारे १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हा कारण्यासाठी वापरलेली मोटार सायकल, चार मोबाईल असा सुमारे १५ लाख रूपये किंमतीचा (बाजारभावाप्रमाणे) मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून एकूण १७ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
गुन्हयातील नामे मिलींद ऊर्फ मिलन ईश्वर भोसले याच्यावर अहमदनगर, बीड, पुणे ग्रामीण जिल्हयात घरफोडी, जबरी चोरी, मालमत्ता चोरी असे १६ गुन्हे दाखल असून सदर आरोपीने जुलै-२०२३ मध्ये शिरूर पो. स्टे हद्दीत अवैध गावठी पिस्टलने फायर करून जबरी चोरी केली होती. सदर गुन्हयातून तो मे-२०२४ मध्ये जामीनावर बाहेर आला आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून पुढील तपास नारायाणगाव पोलीस स्टेशन करत आहेत.