नारायणगाव (पुणे): जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे बुधवारी (दि. २५) पहाटेच्या सुमारास प्रातः विधीसाठी घराच्या पाठीमागे गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर सोयाबीनच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने अचानक प्राणघातक हल्ला केला. या दुर्देवी घटनेमध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
रूपेश तानाजी जाधव (वय ९. रा. तेजेवाडी, मुळगाव मौसगाव, ता. राहुरी, जिल्हा नगर) याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तेजेवाडी गावातील ओझर-लेण्याद्री रस्त्यालगत वीटभट्टी व्यावसायिक राजेंद्र शिंदे यांच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगार रामभाऊ जाधव यांचा नातू रूपेश हा नुकताच त्याचे मूळ गाव मौसगाव (ता. राहुरी, जि. नगर) येथून आजी-आजोबांकडे राहण्यासाठी आला होता. रूपेश हा पहाटे पाचच्या सुमारास घराच्या मागील बाजूस शौचास बसला. त्यावेळी लगत असलेल्या सोयाबीनच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने अचानक चिमुकल्यावर झडप घातली.
त्यावेळेस समोरच असलेल्या मुलाच्या आजोबांनी आरडाओरडा करत बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, बिबट्याने मुलाला शेजारच्या ऊसाच्या शेतात फरफटत नेले. या घटनेची माहिती गावातील नागरिकांना समजताच वन विभागाला घटनेची माहिती दिली. या वेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जुन्नर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व ३०-३५ वनकर्मचारी आणि रेस्क्यू टीम सदस्य, गावातील नागरिक, तरुण यांच्या मदतीने तत्काळ घटनास्थळी पोहोचून मुलाचा शोध सुरू केला.
एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर मुलाचा मृतदेह शेजारच्या उसाच्या शेतात मिळाला. या वेळी नातेवाइकांनी शोक व्यक्त केला. घटनास्थळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी तत्काळ भेट देऊन पाहणी केली. सरपंच, उपसरपंच व वनकर्मचारी यांच्याशी घटनेबाबत चर्चा केली. नरभक्षक बिबट्याला पकडण्याकरिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तत्काळ पिंजरे व ट्रैप कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या.
ग्रामस्थांनी दक्ष राहावे
कुकडी नदीच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांची मोठी संख्या आहे. शेतातील व लगतच्या प्रत्येक घराभोवती भरपूर प्रकाशदिवे लावणे, घराभोवतीचे व शेत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे संपूर्ण गवत काढून टाकणे, दिवस उगवण्यापूर्वी आणि मावळल्यानंतर शक्यतो घराबाहेर न पडणे, अपरिहार्य असल्यास सोबत टॉर्च व मोठी काठी बाळगणे या सूचनांचे गांभीर्याने पालन ग्रामस्थ यांनी करावे, असे आवाहन जुन्नर वन विभागाकडून करण्यात आले आहे.