जुन्नर (पुणे): जुन्नरमधील एका नामांकित शाळेमधील लिपिक महिला कर्मचारी आपल्या दुचाकीवरून शाळेत येत असताना एका शिक्षकाने त्यांचा पाठलाग करून भर रस्त्यात अडवून कार्यालयीन कामकाजाची माहिती विचारण्याच्या बहाण्याने तुम्ही मला आवडता, मी तुमच्याशी लग्न करेन, असे म्हणत त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन केले. तसेच या महिलेच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडील, भावाला त्याने शिवीगाळ व दमदाटी करीत धमकी दिली. या प्रकरणी सदर शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन किसन मुंढे (रा. राजुर पेठेचीवाडी, ता. जुन्नर) असे दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. एका ३५ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नरमधील एका नामांकित शाळेमधील लिपिक महिला कर्मचारी आपल्या घरून दुचाकीवरून शाळेत येत असताना या शिक्षकाने सोमतवाडी येथे त्यांना भर रस्त्यात अडवून लज्जास्पद वर्तन केले. त्यानंतर या महिलेच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडील व भावाला शिवीगाळ करीत धमकी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सागर हिले करीत आहेत. दरम्यान, या शिक्षकाविरोधात गेल्या काही दिवसांपूर्वी एक गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल आहे.