मुंबई : माझगाव येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना 15 दिवसांची साधी कैद आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे खणून काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
मेधा सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया
न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढवल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्त्या मेधा सोमय्या यांनी निकालानंतर व्यक्त केली होती. माझ्या कुटुंबावर आरोप करत मुलांना टार्गेट केले होते. एक सामान्य शिक्षका जशी लढेल तशी मी लढले. मी कोर्टाच्या निकालावर समाधानी आहे, असे मेधा सोमय्या म्हणाल्या. संजय राऊत यांच्यावर आयपीसीच्या 499 कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संजय राऊत यांनी आरोप केलेला शौचालय घोटाळा काय आहे?
मेधा सोमय्या या युवा प्रतिष्ठान नावाची एक संस्था चालवतात. राऊत यांनी 2022 मध्ये त्यांच्यावर 100 कोटींचा शौचालय घोटाळा केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. खोटी बिले देऊन पैसे उकळल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याचे कारण दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्या यांनी याचिका दाखल केली होती. संजय राऊत या आरोपींच्या पृष्टीसाठी काहीच पुरावे देऊ शकले नाही, त्यामुळे त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली.