-लहू चव्हाण
पांचगणी : पांचगणी पर्यटन स्थळावर मुख्य बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी आणि पार्किंगची सोय नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. हे ओळखून आता जुने पोलीस ठाणे ते बस स्थानकापर्यंत मुख्य बाजारपेठ रस्ता हा पर्यटक गाड्या पार्किंग झोन केली असल्याची माहिती पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे.
पांचगणी शहरात वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या भेडसावत असल्याने पांचगणी पोलीस ठाणे, नगरपालिका आणि व्यापारी वर्ग यांची बैठक पांचगणी पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यामध्ये समन्वयातून हा निर्णय काढण्यात आला. यावेळी सपोनी दिलीप पवार, पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी बांधवांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढला. यामध्ये सर्व स्थानिक व्यापाऱ्यांनी आपले वाहन बाजारपेठेत अथवा स्वतःच्या दुकानासमोर न लावता पार्कीगकरीता पर्यटकांना जागा ठेवावी. जेणेकरुन पांचगणी- महाबळेश्वराला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना गाड्या पार्क करून खरेदी करता येईल. त्यांची गैरसोय होणार नाही. त्यासाठी सर्व व्यापा-यांनी आपली वाहने नगरपालिकेने ठरवुन दिलेल्या पार्किंगमध्येच पार्क करावीत.
पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले की, व्यापा-यांकरीता व पर्यटकांकरीता पे अँड पार्कची व्यवस्था शॉपींग सेंटर व राजलक्ष्मी पार्किंग येथे केलेली आहे. तसेच नगरपालिकेचे पार्किंग येथे फ्री पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या एकेरी वाहतुक, पार्किंग व्यवस्थेच्या नियमांचे कडक पालन करण्यात यावे.
पांचगणी वाहतुक पोलीस, अंमलदार व पांचगणी नगरपालिका यापुढे वाहतुकीचे नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करणार आहे. वाहतुकीचे नियम मोडणा-यावर कडक कारवाई करण्यासाठी पांचगणी वाहतुक पोलीस अंमलदार व पांचगणी नगरपालिका यांनी कंबर कसली आहे. वाहनचालक आणि व्यापारी कसा प्रतिसाद देणार यावरच या नव्या व्यवस्थेचे यश अवलंबून आहे. या बैठकीला व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.