फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. परंतु, या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत दोघांनी फुलंब्री तहसील कार्यालयातील तहसीलदारांची खुर्ची जाळल्याची घटना मंगळवारी (दि. २४) सकाळी घडली. दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. जरांगे यांची तब्येत खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. सरकारकडून मागण्या पूर्ण होत नाहीत आणि जरांगे यांची तब्येत खालावल्याने मराठा समाजात असंतोष आहे. अनेक जिल्ह्यात बंद पाळून सरकारचा निषेध करण्यात आला. यातच फुलंब्री येथे मराठा आंदोलक मंगेश साबळे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात मंगळवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. साबळे आणि अन्य एकाने थेट तहसीलदार यांच्या दालनातून त्यांची खुर्ची बाहेर आणत तहसीलच्या आवारातच पेट्रोल टाकून पेटविली.
फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे हे दोन सहकाऱ्यांसह सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयात आले. तहसीलदार यांच्या दालनात कोणी नसल्याने त्यांनी खुर्ची बाहेर काढली व पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. त्यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. अचानक ही घटना घडली यावेळी काही कर्मचारी तिथे उपस्थित होते. त्यांनी काही विरोध केला नाही. त्यानंतर काही वेळात मंगेश साबळे आपल्या सहकाऱ्यांसोबत निघून गेले.
आमचे एन्काऊंटर कराः आंदोलक
सरकारने मराठा आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगे यांचा बळी द्यायचा आहे, असा आरोप करत आमचेदेखील एन्काउंटर करावे, असे आंदोलकांनी म्हटले. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने तहसीलदारांची खुर्ची पेटवून निषेध केला, अशी प्रतिक्रिया सरपंच मंगेश साबळे यांनी दिली.
गुन्हा दाखल करणार : तहसीलदार
जातवा येथील तरुणाने सोमवारी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती, त्यासंदर्भात मी घाटी रुग्णालयात गेलो होतो. तहसीलमधील खुर्ची जाळल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ परतलो, संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे तहसीलदार डॉ. कृष्णा काणगुले यांनी सांगितले.