पुणे : हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त वडगाव शेरी येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ट्रॅक्टरवर उभे राहून झेंडा फिरवताना वीजेचा धक्का बसून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. जाकीरिया बिलाल शेख (वय-२०, रा़. वडगाव शेरी) व अभय अमोल वाघमारे (वय-१७, रा. वाडेश्वरनगर, वडगाव शेरी) अशी मृत्यु झालेल्या तरुणांची नावे आहेत.
याप्रकरणी मिम बॉईज यंग फ्रेन्ड सर्कलचे अध्यक्ष हुसेन कादर शेख (वय ३५, रा. वडगाव शेरी), ट्रॅक्टर चालक विकास अच्युत कांबळे (वय ३२, रा. वाघोली), साऊंड सिस्टीमचे चालक अक्षय बापू लावंड (वय २८, रा. चंदननगर), एलएडी स्क्रीन लावणारे संतोष धावजी दाते (वय ३६, रा. राजगुरुनगर, खेड) यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहंमद पैगंबर जयंतीनिमित्त वडगावशेरी येथील मिम बॉईज यंग फ्रेन्ड सर्कल यांनी रविवारी मिरवणुकीचे आयोजन केले होते. अध्यक्ष हुसेन शेख यांनी पोलिसांनी दिलेल्या शर्ती व अटीचे सूचनांचे पालन केले नाही. तसेच त्याकडे दुर्लक्ष करुन मिरवणुकीत झेंडे व स्टीलचे पाईप उपलब्ध करुन दिले.
विकास कांबळे याने ट्रॅक्टर ट्रॉलीचे फाळके काढून विना परवाना लाकडी स्टेज टाकला. अक्षय लावंड याने साऊंड सिस्टिम लावून एकावर एक साऊंड रचून मर्यादापेक्षा उंची निर्माण केली. तसेच संतोष दाते याने ट्रॅक्टरवर लोखंडी फ्रेम लावून एलएडी स्क्रीन लावून त्याची मर्यादेपेक्षा अधिक उंची निर्माण केली. त्यामुळे अभय वाघमारे हा लोखंडी फ्रेमवर चढून हातात स्टीलचा पाईप असलेला झेंडा फिरवत होता. त्यावेळी त्याच्या उंचीवर असलेली महावितरणच्या वीज वाहिनीला स्टील पाईपचा स्पर्श झाला. त्यामुळे वीजेचा धक्का बसून यामध्ये अक्षय आणि त्याच्या बरोबर असलेला जाकीरिया शेख य दोघांचा मृत्यु झाला.
याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोषी जबाबदार चौघांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. या घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून दोघांच्या मृत्यूचा सखोल तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने करीत आहेत.