-राहुलकुमार अवचट
यवत : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा स्वप्नपूर्ती सोहळा व लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असताना सर्वांसाठी घरे देण्याची संकल्पना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखली आहे. हेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने “प्रधानमंत्री आवास योजना – सर्वांसाठी घरे” हे व्यापक अभियान सुरू केले. यातील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील दौंड तालुक्यातील लाभार्थ्यांचा मेळावा गुरुवार (दि. 26 सप्टेंबर 2024), सकाळी 10.30 वाजता, श्री. सिद्धेश्वर मंगल कार्यालय, पिंपळगाव, ता. दौंड येथे आयोजित करण्यात आला आहे.
दौंड तालुक्यातील सुमारे 51 महसुली गावांचा समावेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये असल्याने या गावातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना शहरीद्वारे प्रत्येकी 2 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळत आहे. या योजनेअंतर्गत दौंड तालुक्यातील आतापर्यंत 2 प्रकल्प अहवाल मंजूर झाले. त्यामध्ये 2500 हुन अधिक लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी सुमारे 600 घरकुलांचे काम झाले आहे. डिसेंबर 2024 पर्यंत उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत दौंड तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा, या योजनेची अंमलबजावणी गतिमान व्हावी, यासाठी तालुक्याचे आमदार ॲड.राहुल कुल यांनी शासन दरबारी वेळोवेळी संबधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. याबाबत पाठपुरावा देखील केला आहे. तसेच उर्वरित नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी नवीन प्रकल्प अहवाल मंजूर व्हावा, यासाठी आमदार ॲड. राहुल कुल यांचा पाठपुरावा सुरु आहे.
या मेळाव्याला सर्व लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार राहुल कुल यांच्या वतीने करण्यात आले आहे.