पुणे : पुण्यात रुग्णालयातील छतावर सौर उर्जा यंत्रणा बसविण्याच्या आमिषाने एका डॉक्टरांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप बबन जामदार (रा. बेंडा बुद्रुक, ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका डॉक्टरांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे शहरातील मंगळवार पेठेतील पारगे चौकात रुग्णालय आहे. तक्रारदार डॉक्टरांच्या रुग्णालयातील छतावर सौर उर्जा यंत्रणा बसविण्यात येणार होती. याचे काम आरोपी प्रदीप जामदार यांनी घेतले होते़. यासाठी आरोपी जामदारने सौर उर्जा यंत्रणा बसवून देण्यासाठी साडेसात लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले होते. त्या पोटी फिर्यादी यांच्याकडून ४८ हजार रुपये तसेच ऑनलाईन ७ लाख रुपये घेतले.
त्यानंतर सोलर सिस्टीम बसविण्याचे काम अर्धवट सोडून तो निघून गेला. काम पूर्ण करण्याविषयी अनेक वेळा सांगितल्यानंतरही त्याने काम पूर्ण केले नाही. तसेच उर्वरित अर्धवट कामाचे पैसे परत मागितले असता पैसे परत देण्यास नकार देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.