-संतोष पवार
पळसदेव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला (BARTI) दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची 100 टक्के रक्कम संशोधक विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. मात्र, या निर्णयामुळे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (SARTHI) आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (MAHAJYOTI) संस्थांतील संशोधक विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100 टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सारथी’संस्थेच्या 1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत कायम नोंदणी असलेल्या 724 विद्यार्थ्यांना आणि ‘महाज्योती’च्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ अदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नियोजन विभागाने ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100 टक्के अधिछात्रवृत्ती मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली असून इतिवृत्त मान्यतेची वाट न पाहता यासंबंधीचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी तिन्ही संस्थांच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांकडे शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना सरसकट 50 टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. मात्र, बार्टीच्या संशोधक उमेदवारांनी हा निर्णय झुगारून त्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. त्यानंतर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बार्टीच्या 763 उमेदवारांना 100 टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे आता सारथी, महाज्योती या संस्थेतील संशोधक उमेदवार संतप्त झाले होते. त्यांच्याकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यापुर्वीच राज्य सरकारकडून सारथी व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100 टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला.