नागपूर : राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी लाडकी बहीण ही महत्त्वाची योजना आहे. मात्र या योजनेमागची खरी ‘भानगड’ समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना का आणली? याबाबत भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. आता काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओचा आधार घेत वडेट्टीवार यांनी राज्य सरकावर हल्लाबोल केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर त्या भाजप नेत्याचा व्हिडिओ करत पोस्ट लिहिली आहे, ” अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे.
भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना म्हटलं की, आम्ही एवढी मोठी भानगड कशाला केली आहे, इमानदारीनं सांगा. ज्यावेळी तुमच्या घराजवळ निवडणुकीची मतपेटी येईल त्यावेळी आमची ‘लाडकी बहीण’ कमळाला मतदान करेल. यासाठीच तर आम्ही हा जुगाड केला आहे. बाकी सगळे खोटं बोलले असतील, मात्र मी खरं बोलत आहे. बोलायचं एक आणि करायचं एक असं आम्ही करत नाही, असं आमदार टेकचंद सावरकर यांनी म्हटलं आहे.
अखेर महायुतीची भानगड पुढे आली!
महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे.
भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे. pic.twitter.com/EL6d0Jc6vW
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 24, 2024