बदलापूर : बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे हा पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पोलिसांनी संरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याचंही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून त्याने तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या. यामध्ये त्याचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, अक्षय शिंदेची आत्महत्या नसून पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचे समोर आले आहे.
अक्षय शिंदे याला पोलीस कोठडीत घेऊन जाण्यात येत होते. त्यावेळी त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. यानंतर संरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवर भाष्य करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे बदलापूर अत्याचार प्रकरणातील सरकारचे वकील उज्जवल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उज्जवल निकम म्हणाले, बदलापूर आरोपीवरील गोळीबारप्रकरणी घटनेची न्यायालयीन चौकशी होईल, त्यासंदर्भात आज काहीही बोलणं योग्य होणार नाही. याबाबत मला अधिकृत माहिती नाही, माझं कुठल्याही अधिकाऱ्यासोबत बोलणं देखील झालं नाही, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.
नेमक प्रकरण काय?
बदलापूरमध्ये शिशु वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत कर्मचारी असलेला अक्षय शिंदे याने शाळेतच अत्याचार केला होता. याप्रकरणी नराधम अक्षय शिंदे याला पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली होती. दरम्यान, दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली अक्षय शिंदेनी नुकतीच पोलिसांकडे दिली होती.
दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले आणि 20 ऑगस्ट रोजी शाळा परिसर तसेच रेल्वे स्टेशन मध्ये 10 तास रेल रोको आंदोलन झाले होते. शेवटी या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली व फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालविण्याचे काम सुरु केले.
खटला सुरु असलेल्या कल्याण न्यायालयमध्ये एका विशिष्ठ रूममध्ये पीडित तीन आठवड्यांपूर्वी मुलींसमोर आरोपीची ओळख परेड पार पडली. विशेष म्हणजे नॉन रिफ्लेक्टेड काचेच्या माध्यमातून ही ओळख परेड झाल्याने पीडित मुलगी आरोपीला पाहू शकत होती, मात्र आरोपीला पीडित मुलगी दिसत नव्हती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ओळख परेड दरम्यान पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती.
कोण आहे नराधम अक्षय शिंदे?
- अक्षय शिंदेचे वय 24 वर्षे
- अक्षयचे शिक्षण दहवीपर्यंत
- अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई होता. या आधी अक्षय एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.
- एका कंत्राटामार्फत आदर्श शाळेत शिपाई म्हणून रुजू झाला होता.
- अक्षय, आई-वडील आणि त्याचा भाऊ आणि भावाची बायको असं त्याचे कुटुंब आहे.
- अक्षयची तीन लग्न झाली होती, मात्र तिनही बायका सोडून गेल्या होत्या.
- अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील, मात्र अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात झाल आहे.