चाकण : चाकण येथे सख्ख्या भावाचे बनावट सही आणि अंगठे करून जमिनीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सख्ख्या भावासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १७ डिसेंबर २०२१ रोजी चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घडला आहे. आनंदा दामू भोसले (वय-६०, रा. पाडळी, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून गोविंदा ऊर्फ रामू भोसले (रा. पाडळी, ता. खेड), धीरजकुमार सुरेंद्र सेठिया (रा. चाकण), सुनील गणपत वाळुंज (रा. शिरोली, ता. खेड), दीपक कोंडीभाऊ पाबळे (रा. कडधे, ता. खेड) आणि बनावट सही करणारा तोतया व्यक्ती, वकील रवींद्र कर्नावट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आरोपींनी मिळून संगणमत करून फिर्यादीच्या पाडळी येथील वडिलोपार्जित सामाईक जमिनीची विक्री करण्यासाठी साठेखत कायदेशीर दस्त करण्यासाठी कायदेशीर मान्यता देणार म्हणून फिर्यादी आनंदा भोसले यांचे सही, अंगठे आवश्यक असताना फिर्यादीच्या ऐवजी दुसरीच व्यक्ती कोणीतरी उभी केली.
त्यावर फिर्यादीचे खोटे बनावट सही, अंगठे करून त्या दस्ताचा वापर करून खरेदीखत केले. त्यानंतर फेरफार करत असताना हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सर्व आरोपीवर फसवणुकीचा तसेच इतर कलमानुसार गुन्हे दाखल झालेले आहेत. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.