-गोरख जाधव
डोर्लेवाडी, (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मनात आणले तर एखाद्या संस्थेचा, एखाद्या गावाचा कायापालट कसा होऊ शकतो, याचे उदाहरण पुन्हा एकदा डोर्लेवाडीच्या ग्रामस्थांनी अनुभवले आहे. शरद पवार यांनी डोर्लेवाडी येथील विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला.
डोर्लेवाडी (ता. बारामती) रयत शिक्षण संस्थेच्या येथील इमारतीची पाहणी करण्यासाठी व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पवार यांनी येथील संस्थेला शनिवारी भेट दिली होती. यावेळी गावातील काही युवक कार्यकर्त्यांनी शाळेच्या जागेसंदर्भात व जीर्ण झालेल्या बांधकाम इमारती संदर्भात शरद पवार यांना मागील महिन्यात निवेदन दिले होते.
ग्रामस्थ संवाद साधताना शाळेच्या संदर्भात चर्चा करताना पवार यांनी दीड कोटी रुपये व पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 3 कोटी रुपयांचा धनादेश शाळेकडे सुपूर्त केला. आपण गावक-यांनी शाळेसाठी काहीतरी मदत करावी, असे आव्हान करताच त्याला प्रतिसाद देत 35 लाखांची मदत गावकऱ्यांनी वर्गणी स्वरूपात जाहीर केली. अवघ्या काही वेळातच 4 कोटी 85 लाख रुपयांचा निधी शाळेच्या बांधकामासाठी उभा राहिला. जेव्हा जागेसंदर्भात पूर्ण प्रश्न मार्गी लागेल तेव्हा बारामती तालुक्यातील सर्वात सुंदर रयत शिक्षण संस्थेच दर्जेदार संकुल या जागेवर उभा राहणार आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकात दळवी, विश्वस्त सदाशिव सातव, युवा नेते युगेंद्र पवार, सरपंच सुप्रीया नाळे, उपसरपंच विश्वजीत घोडे, पंचायत समिती माजी सभापती अशोक नवले, अशोकराव मोरे, नामदेव घोरपडे, बापूराव गवळी, पंढरीनाथ नाळे, न्यामत्तुल्ला शेख, पोपट मोरे, रुपाली लोणकर, सुभाष शिंदे, मुख्याध्यापक महेशकुमार भिंगारदेव ग्रामपंचायत सदस्य. सुमित्रा वामन, राणी नेवसे, छबुताई मदने, सामाजिक कार्यकर्ते गजानन नाळे, रणजित मोरे, मंगेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या शाळेच्या जागेसाठी बापुराव गवळी व गजानन नाळे मित्र परिवार यासाठी यशस्वी लढा देत आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले, “मी देखील एक रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण कशा प्रकारे चांगले मिळेल याच्याकडे आमचे लक्ष राहीलचं. आपल्या संस्थेचे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत. माझा जर कधी परदेशात जाण्याचा योग आला तर तेथे आपले विद्यार्थी भेटल्यावर ते छातीठोकपणे सांगतात साहेब मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. मला डोर्लेवाडी गावाने आजपर्यंत खूप सहकार्य केलं आहे. त्यासाठी मला यापुढे ही या गावासाठी या शाळेसाठी चांगल काम करायचं आहे. या शाळेच्या निमित्तान एक उत्तम कर्तृत्ववान पिढी मला गावामध्ये पाहायची आहे.
दरम्यान, वास्तविक पाहता रयत शिक्षण संस्थेची शाळा जिथे भरते ती जागा व इमारत ही छत्रपती सहकारी भवानीनगर यांची आहे. ती पूर्वी काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला बक्षीसपत्र करून दिलेली होती व पुढे ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभेत ठराव करून सदरची जागा छत्रपती सहकारी भवानी नगर यांना दिलेली आहे व दोन वर्षापूर्वी काखान्याच्या जनरल सभेपुढे सदरची जागा डोर्लेवाडी ग्रामपंचायतीला परत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. परंतु अद्याप त्याबद्दल येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर व प्रशासकीय स्तरावरील कोणतीच हालचाल झालेली नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे.
शाळेच्या इमारतीचा प्रश्न गंभीर आहेच पण त्यापेक्षाही अधिक पटीने जागा हस्तांतरणाचा प्रश्न आहे. आम्हीही गेली कित्येक वर्ष झाल अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती कारखाना डोरलेवाडी ग्रामपंचायत व प्रशासन यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत आहोत व जागा हस्तांतरणाच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. कारण जागेचा प्रश्न निकाली निघाला तरच शाळेच्या इमारतीचा विषय निकाली निघणार आहे. शाळेच्या विषयासाठी आम्ही पक्ष गटतट या गोष्टी बाजूला ठेऊन संपूर्ण सहकार्याने एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी संपूर्ण गावक-यांनी एकत्र आले पाहिजे.
-अशोकराव नवले, अध्यक्ष -स्थानिक स्कुल कमिटी न्यू इंग्लिश स्कुल, डोर्लेवाडी