राजगुरूनगर, (पुणे) : खेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संदीप गोरक्ष पर्वते (वय-३५ ) मुळगाव अकलूज, जिल्हा सोलापूर ) असं कर्तव्य बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आईवडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संदीप पर्वते हे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील रहिवाशी आहेत. गेल्या महिन्यापूर्वी ते खेड पोलीस ठाण्यात बदली होऊन आले होते. सकाळी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पोलीस कर्मचारी अर्जुन गोडसे व सहकाऱ्यांनी त्यांना साळुंखे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चाकण येथील रुग्णालयात नेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.