पुणे : बारामतीच्या डोर्लेवाडी गावातील एका कार्यक्रमात पाठीमागे बसलेल्या महिला सरपंचांना पुढे बोलावून भाषण करा असं म्हणत शरद पवारांनी महिला सरपंचांचे कान टोचले आहेत. शरद पवार आज बारामती डोर्लेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सरपंच यांचे पती पुढे बोलत होते. म्हणून, शरद पवार यांनी विचारलं सरपंच कुठे आहेत? सरपंचाला पुढे बोलवा असे आदेशच शरद पवार यांनी दिले.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, पंचायत समिती याठिकाणी लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. परंतु अजूनही ग्रामीण भागात नाव महिलांचे असते, मात्र कारभार त्यांचे पतीच चालवत असतात. सरपंचपदी महिला असते, पण कार्यक्रमात सरपंचाच्या खुर्चीवर महिलेचा पती असतो. दरम्यान, बारामतीत एका कार्यक्रमात ही बाब शरद पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधितांचे चांगलेच कान टोचले आहेत.
नेमकं काय घडलं?
बारामती डोर्लेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी, कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महिला सरपंच यांचे पती पुढे बोलत होते. म्हणून, शरद पवारांनी विचारलं सरपंच कुठं आहेत? सरपंचाला पुढे बोलवा, असे आदेशच शरद पवार यांनी दिले.
डोर्लेवाडीच्या महिला सरपंच पुढे आल्यावर शरद पवारांनी त्यांना याबाबत विचारणा देखील केली. आम्ही तुम्हाला सत्ता दिली आहे, ती मागे बसायला दिली का? असा सवाल महिला सरपंचांना शरद पवारांनी विचारला आणि महिला सरपंचास पुढे बसवलं. शरद पवारांच्या या कृतीचं डोर्लेवाडी गावात कौतूक करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्या या कृतीचं कौतूक केलं जात आहे.