पिंपरी : धुळे येथून आणलेल्या गांजाची हिंजवडी आयटी पार्क परिसरातील मोठ्या महाविद्यालयांच्या बाहेर विक्री करणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून तब्बल 33 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
सुरेंद्रकुमार संतोष त्रिपाठी (36, रा. म्हाळुंगे, पुणे. मूळ रा. चित्रकुट, ता. श्रीरामपुर, जि. चित्रकूट धाम करवी, उत्तर प्रदेश), अशोक गुलाबचंद पावरा (वय 19), पवन सानू पावरा (19, दोघे रा. मांजणी पाडा, फतेपुर फॉरेस्ट, ता. शिरपूर, जि. धुळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे परिसरात गस्त घालत असताना पोलिस अंमलदार निखिल शेटे आणि मयूर वाडकर यांना तीन जण संशयास्पदरित्या आढळले. पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे 16 किलो 104 ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल, असा 9 लाख 50 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींकडे केलेल्या चौकशीत आणखी 8 लाख 50 हजार 450 रुपये किंमतीचा गांजा मिळून आला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण 33 किलो वजनाचा 18 लाख 650 रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.