केडगाव: गणेश विसर्जन या दिवशी जिल्हाधिकारी पुणे यांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व बिअरवार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. दौंड तालुक्यातील केडगाव येथील हॉटेल त्रिमूर्ती परमिट रूम आणि बिअरबारच्या पाठामागील बाजूने दारू विकत असल्याचे निदर्शनास आले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने यवत पोलिसांनी बिअरबारवर कारवाई केली.
ब्रह्मानंद सुभाष निंबाळकर (वय ४३, रा. केडगाव स्टेशन, ता. दौंड) असे कारवाई केलेल्या बिअरबार मालकाचे नाव आहे. राज्यात गणेशोत्सव दि. ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला गेला. मंगळवारी गणेश विसर्जन असल्यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी मद्य विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश संबंधितांना दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून केडगाव येथील हॉटेल त्रिमूर्ती परमिट रूम आणि बिअरबारचे मालक ब्रह्मानंद निबाळकर हे बिअरबारच्या पाठीमागील बाजूचे लोखंडी शटर उघडून नागरिकांना मद्य विकत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता निंबाळकर मद्य विक्री करीत असल्याचे दिसून आले. प्रतिबंधक आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून भंग केल्याने निंबाळकरविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उत्तम कांबळे हे करीत आहेत.