मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८८ मतदारसंघांपैकी १२० ते १३० जागांवर वांद्रे येथील सोफिटेल हॉटेलमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मात्र, विदर्भातील जागेचा तिढा कायम असून, पुढील बैठकीत त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच मतदारसंघनिहाय पक्षाची ताकद याचा आढावा घेण्यासाठी आवश्यकतेनुसार एजन्सीची नियुक्ती करण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसने शंभरहून अधिक जागांचा दावा केल्याने आघाडीत अंतर्गत वाद रंगला आहे. तरीही येणारी निवडणूक म्हणून एकत्र लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या बैठकीत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला जागा वाटपात देण्याबाबत चर्चा झाली. परंतु, जिंकलेल्या जागांमध्ये १० ते २० टक्के बदल केला जाणार आहे.
मुंबई आणि कोकण सेनेसाठी सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी आहे. तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागातील विधानसभा मतदारसंघातील जागांवर काँग्रेसकडून दावा ठोकला जातो आहे. मात्र, कुठल्या मतदारसंघात कुठल्या पक्षाची ताकद याचा आढावा घेण्यात येणार आहे. आवश्यकता वाटल्यास एजन्सीची नियुक्ती करून पुन्हा एकदा मविआची जागा वाटपाबाबत चर्चा होईल, असे आव्हाड म्हणाले. विदर्भातील विधानसभा जागांवर पुढील बैठकीत चर्चा होऊन त्या संदर्भातसुद्धा लवकरच निर्णय घेतला जाईल. लवकरात लवकर जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी नेते प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.