नांदेड: माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते भास्करराव पाटील-खतगावकर यांनी शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी त्यांच्या स्नुषा डॉ. मिनल पाटील- खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनीही आपल्या कार्यकत्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी पटोले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
या वेळी पटोले म्हणाले की, भास्करराव पाटील-खतगावकर हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पदाधिकारी व वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. टिळक भवनमध्ये पक्षप्रवेश झाला असला, तरी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रम घेऊन पक्षप्रवेश सोहळा केला जाईल. खतगावकर यांच्या प्रवेशाने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला आणखी बळ मिळेल आणि विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातूनही काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आहे.
भास्करराव पाटील-खतगावकर म्हणाले की, काँग्रेस पक्षात प्रवेश करताना पुन्हा माझ्या घरी आल्याचा आनंद होत आहे. काँग्रेस पक्षाने आमदार, खासदार, मंत्रीपदावर काम करण्याची संधी दिली आहे. मध्यंतरी दुसऱ्या पक्षात गेलो होतो, पण आता घरी आलो आहे. पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष राज्यात मजबूत होत असून, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे खतगावकर म्हणाले. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी माजी मंत्री अमित देशमुख, डी. पी. सावंत, आमदार मोहनराव हंबर्डे तसेच नदिड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.