दौंड : खून, दरोडा प्रकरणात मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या व सात वर्षापासून फरार असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्हा ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने श्रीगोंदा (अ.नगर) गावात सापळा रचत जेरबंद केले. मिथुन बंडा काळे (रा.अकोनी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 20 सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक दौड विभागात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली कि, 2017 साली दौंड तालुक्यातील सौरवडी गावात धावडे यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये दरोडेखोरांनी घरातील लोकांना मारहाण करीत किमती ऐवज लुटून नेला होता. त्या प्रकरणातील तसेच मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेला फरार आरोपी मिथुन काळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा गावातील बाजारपेठेत येणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक साध्या वेशात श्रीगोंदा येथे रवाना होऊन बाजारपेठेत सापळा रचला व खबर कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपण मिथुन बंडा काळे असल्याचे त्याने सांगितले. आरोपीस पुढील तपास कामी दौंड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरदार, पोलीस उपअधीक्षक बाप्पुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राहुल गावडे. पो. हवा सचिन घाडगे,पो. हवा आसिफ शेख, पो. हवा विजय कांचन, पो. हवा अजित भुजबळ, पो. हवा योगेश नागरगोजे, पो. शि धिरज जाधव यांनी केली आहे.