मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांची महामंडळ, विविध समित्यांवर वर्णी लावण्याचा धडाका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आहे. विधिमंडळ अथवा संसदीय सदस्यातून मिलिंद देवरा, सदा सरवणकर यांची नामनिर्देशित सदस्य तर मनीषा कायंदे, श्रीराम रावराणे आदींची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहे. नियोजन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी केला.
जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ व संसद सदस्यांतून नामनिर्देशनाच्या दोन सदस्यांची, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले ४ नामनिर्देशित सदस्य तसेच सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ६ व्यक्तींची विशेष निमंत्रित म्हणून मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती केली आहे. मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रितांचे नामनिर्देशन पुढील आदेश होईपर्यंत किंवा शासनाकडून या नामनिर्देशन रद्द होईपर्यंत अबाधित राहतील, असे निर्णयात नमूद केले आहे.