पुणे : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच नेत्यांचे दावे-प्रतिदावे आता समोर येऊ लागले आहेत. अशातच आता आमदार बच्चू कडू यांचं विधान चर्चेत आलं आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. आज पुण्यामध्ये तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांची बैठक पार पडली असून या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू आदी नेते उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी महायुतीमधून अप्रत्यक्षपणे बाहेर पडल्याचे सांगितले.
बच्चू कडू यांचा प्रहार..
तिसऱ्या आघाडी संदर्भात पुण्यात बैठक पार पडल्यानंतर संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी महायुती बाहेर पडलो हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली, असे म्हणत महायुतीला सोडचिट्टी दिल्याचे जाहीर केले आहे. बच्चू कडू म्हणाले की, परिवर्तन महाशक्तीच्या चिन्हाबाबत लवकरच माहिती देऊ. जे धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांना सोबत घेणं आम्हाला जमणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सुसंस्कृत महारष्ट्राला वेगळा पर्याय देत आहोत..
परिवर्तन महाशक्ती या नावाने एक सुसंस्कृत महारष्ट्राला वेगळा पर्याय देत आहोत. राज्यातील जनता अस्वस्थ आहे. त्यामुळे महारष्ट्रामध्ये परिवर्तन घडू शकतं. महायुती किंवा माविआ यांच्या नावावर कोणाचा सातबारा आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. अजून आपण त्याच प्रश्नावर लढत आहोत. आज पक्षांची नावे बुद्रुक खूर्द अशी गावांच्या नावासारखी झाली आहेत. परिवर्तन महाशक्तीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा आहे, तिकडे ज्यांना यायचं त्यांनी यावे.
संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले की, ज्योती मेटे यांच्यासोबत बोलणं झालं असून त्या सुद्धा सकारात्मक आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली असून ते सुद्धा सोबत येतील. मनोज जरागे यांनी पण एकत्रित यावे यसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांची भेट झाली आहे, राजकीय चर्चाही झाली आहे. आपण एक उद्दिष्ट घेऊन आपण लढू, ते आम्ही एकत्रित आलो तर आम्ही सगळे निवडून आणू शकतो, असे त्यांनी सांगितले आहे.
परिवर्तन महाशक्तीमध्ये ज्यांना यायचं आहे त्यांनी यावे…
राजू शेट्टी यांनी सांगितले की, परिवर्तन महाशक्तीमध्ये सामूदायिक नेतृत्व असेल. समन्वय समिती करू ते सर्व निर्णय घेईल. 26 सप्टेंबरपर्यंत ज्यांना यात यायचे आहे त्यांनी यावे, असे आवाहन त्यांनी केले. सामान्य माणसाला पर्याय म्हणून काम करू, असे त्यांनी सांगितले. स्वच्छ चरित्र स्वच्छ चेहरा देण्याचं आमची कल्पना आहे, परिवर्तन महाशक्तीमध्ये ज्यांना यायचं आहे त्यांनी यावे, असे त्यांनी सांगितले.