मुंबई : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांना लोकलमधून प्रवास करताना प्रचंड त्रास होतो. ही बाब लक्षात घेता आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा मिळणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने हायकोर्टाला दिली आहे.
मध्य आणि पश्चिम उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक गाड्यांमध्ये काही जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, उपनगरीय लोकल गाड्यांमधील गर्दीचा विचार करता ज्येष्ठ नागरिकांना त्या जागांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या या त्रासावर उपाय म्हणून अपंग प्रवाशांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करण्याची मागणी वकील के. पी. पी. नायर यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे.
वकील के.पी.पी नायर यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी, याबाबतची माहिती न्यायालयाला देण्यात आली. तसेच, रेल्वे प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक उपाययोजना केल्या जात आहे. येत्या दोन वर्षात मध्य रेल्वेच्या 155, तर पश्चिम रेल्वेवरील 105 माल डब्यांचे ज्येष्ठ नागरिकांसाठींच्या स्वतंत्र डब्यात रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून खंडपीठाला देण्यात आली. मात्र, त्याबाबतचा कार्यादेश अद्याप काढण्यात आलेला नसल्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, हा कार्यादेश लवकरात लवकर काढण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.
या सुनावणीदरम्यान, मुख्य न्यायमुर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमुर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला महत्त्वाचे आदेश देखील दिले. ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करुन दिला जाईपर्यंत त्यांना मालडब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, असे आदेश हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला दिले.