पुणे : पुण्यातून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. घरगुती वादातून ७० वर्षीय भावजयीच्या अंगावर ६० वर्षीय दीराने गरम तेल ओतून त्यांच्या पाठीवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरासमोर सोमवारी ( दि. १६ सप्टेंबर ) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी लक्ष्मी सुधाकर कदम (वय-७०, रा. आंबेडकर हौसिंग सोसायटी, येरवडा ) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गौतम नामदेव कदम (वय-६०, रा. आंबेडकर हौसिंग सोसायटी, येरवडा ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे धीर भावजय म्हणून नातेवाईक आहेत. या दीर भावजयमध्ये घरगुती कारणांवरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. आंबेडकर सोसायटीमध्ये शिवण क्लासचा समारंभ होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर फिर्यादी या घरी जात होत्या.
दरम्यान, त्या घरासमोर आल्या त्यावेळी घरगुती वादाचा राग मनात धरुन त्यांचा दीर गौतम याने त्यांच्या अंगावर गरम तेल ओतले. त्यानंतर त्यांच्या पाठीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक टकले आहेत.