मुंबई : राजकारण म्हटलं म्हणजे नेत्यांचे दावे, त्यांचे विधानं खूपच चर्चेत असतात अशात आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं एक विधान चर्चेत आलं आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांची दिविजा फाऊण्डेशन असून ते त्या मार्फत दरवर्षी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन झाल्यानंतर समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेत असतात.
बुधवारी सकाळी साडेसहा वाजता वर्सोवा किनारपट्टीवर साफसफाई करण्यासाठी खुद्द अमृता फडणवीस मैदानात उतरल्या आहेत. हे सर्व पाहून मंत्री मंगलप्रभात लोढा प्रचंड प्रभावित झाले आहेत. त्यांनी मिसेस फडणवीस यांना यापुढे ‘अमृता मॅम’ ऐवजी ‘अमृता माँ’ बोलणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उपस्थित होते.
नेमकं काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?
मी दिविजा फाऊण्डेशनच्या सर्वेसर्वा अमृता मॅम यांना विनंती करतो, की तुम्ही जसा समुद्र किनाऱ्यांवरील कचरा साफ करता, ते अतिशय चांगलं काम आहे. परंतु, त्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात जी घाण आली आहे, त्यासाठीही तुम्ही पुढाकार घ्यावा, महाराष्ट्राचं राजकारणही स्वच्छ करावं, अशी सर्वांच्या वतीने मी विनंती करतो, असं मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले.
मी त्यांना ‘मॅम अमृता’ नाही, तर ‘माँ अमृता’ असं संबोधणार..
अमृता ताई यांनी आता एक ‘माँ’चं रुप घेतलेलं असून त्यांच्यामुळे जे मुला मुलींसाठी काम होत आहे, त्यामुळे आजपासून मी त्यांना ‘मॅम अमृता’ नाही, तर ‘माँ अमृता’ असं संबोधणार आहे, असंही मंगलप्रभात लोढा म्हणाले.
मंगलप्रभात लोढा कोण आहेत?
मंगल प्रभात लोढा हे अब्जाधीश व्यावसायिक असून त्याचा रिअल इस्टेटमध्ये दबदबा आहे. ते भारतीय जनता पक्षाचे नेते असून त्यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषवले आहे. महायुती सरकारमध्ये सध्या ते पर्यटन मंत्रालय, तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री आहेत.