कुर्ला : कुर्ला येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची मुलगी व त्यांचा जावई मंगळवारी (दि.१७) कुर्ला येथील हॉस्पीटलमध्ये चेकअप करून घरी परत होते. यादरम्यान कारमध्ये बसत असताना चालकाचा अचानक एक्सीलेटरवर पाय ठेवला गेल्याने कारसोबत काही अंतरापर्यंत फरफटत गेल्याने मलिक यांचे जावई समीर खान गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खान व जावई समीर खान हे मंगळवारी (दि.१७) कुर्ला येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअप करून परत घरी जात होते. यावेळी त्यांची कार चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी वय (३८) चालवत होता. चेकअप होऊन निलोफर आणि समीर बाहेर आले. तेव्हा चालक कारमध्ये झोपला होता. त्यांनी गाडी रुग्णालयातून बाहेर येणाऱ्या गेटवर बोलवली होती. त्यावेळी गाडीमध्ये दोघे पती-पत्नी बसत असताना चालकाकडून अचानक एक्सीलेटरवर पाय ठेवला गेला आणि कार समीर खान यांना फरकटत नेऊन समोर एचडीआयएल वसाहतीच्या संरक्षण भिंतीजवळ जाऊन आदळली. या अपघातात समीर खान गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. तर निलोफर यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
दोघांनाही क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केले असता समीर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून निलोफर यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या समीर हे आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती चिंताजनक येत आहे. या अपघातात फुटपाथवर पार्क असलेल्या तीन मोटरसायकल देखील चिरडल्या गेल्या असल्याचे समोर येत आहे. अपघातामधील कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास विनोबा भावे नगर पोलीस करत आहेत.