पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वीसहुन अधिक आरोपींचा समावेश आहे. वनराज आंदेकर यांच्यावर त्यांच्या घरासमोर १ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबार करत कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली.
सर्वच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई
संजीवनी जयंत कोमकर (रा. ३०९, नाना पेठ) जयंत लक्ष्मण कोमकर (वय ५२), भाचा प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर (३७), कुख्यात गुन्हेगार सोमा ऊर्फ सोमनाथ सयाजी गायकवाड (रा. आंबेगाव पठार, धनकवडी) अनिकेत दूधभाते (रा. आंबेगाव पठार, धनकवडी), तुषार उर्फ आबा कदम (रा. धनकवडी) सागर पवार (रा. धनकवडी), पवन करताल (रा. मंगळवार पेठ) सॅम ऊर्फ समीर काळे, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांच्यासह जवळपास २१ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
वनराज हे बंडू ऊर्फ सुर्यकांत आंदेकर यांचे पुत्र होते. तर, संजीवनी मुलगी आहे. तिचे जयंत कोमकर सोबत लग्न झाले आहे. तर गणेश कोमकर याचे आंदेकरच्या सर्वात धाकट्या मुलीशी लग्न झाले आहे. हे दोघेही आंदेकर यांचे जावई आहेत. तर वनराजचे सख्खे मेव्हणे आहेत. त्यांच्यामध्ये मागील काही महिन्यांपासून वाद सुरू होते. नुकतेच संजीवनी यांच्या दुकानावर अतिक्रमण कारवाई झालेली होती. ही कारवाई माजी नगरसेवक असलेल्या वनराज यांच्या सांगण्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केल्याचा संशय संजीवनी, जयंत यांना होता. याच रागातून वनराज यांच्यावर रविवारी रात्री पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी अगोदर चौकातील लाईटही घालवली होती. शिवाय आंदेकर एकटेच असल्याचा अंदाज घेत आरोपींनी आंदेकर यांच्यावर हल्ला चढवला. घरात कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तेरा ते चौदा जणांनी आधी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्यानं वारही केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.