तुषार ओहोळ
बारामती : घरगुती वापराचे सिलेंडरमधुन ट्रान्सफर पाईपच्या तसेच एस. टी.बी मोटार संचाचे साहयाने लहान मोठया कमर्शिअल ( व्यवसायीक ) सिलेडरमध्ये गॅस भरून भरलेल्या कमर्शीयल टाक्या हॉटेल व्यवसायकांना बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन इसमांविरूध्द सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी निखील अनिल चांदगुडे (रा. खोपवाडी ता. बारामती जि. पुणे ) व एक जण अज्ञान आहे. त्यांच्याकडून घरगुती वापराच्या एच.पी कंपनीच्या ७० गॅस टाक्या सिलेंडर गॅसने भरलेल्या व एक मारूती सुझुकी कॅरी गाडी असा एकुण ८,१५,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांना मिळुन त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, तसेच पोलिस शिपाई किसन ताडगे व जैनक असे सुपा पोलीस स्टेशन हद्दीत सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे खेपवाडी ता. बारामती गावचे हद्दीत गॅसचे टाकीने भरलेली चारचाकी गाडी येणार आहे.
त्या अनुषंगाने कारवाई करत, खोपवाडी कॅनालचे कच्चे रस्त्याने एक चारचाकी मारूती सुझुकी कॅरी गाडी नं एम. एच ११ डीडी ६९९५ ही आली. तिला थांबवुन सदर गाडीची तपासणी करण्यात आली. सदर गाडीमध्ये अनाधिकृतरित्या मानवी जीवन धोक्यात येईल हे माहित असताना ज्वालाग्राही एच.पी कंपनीच्या लहान ७० टाक्या गॅसने भरलेल्या दिसून आल्या.
त्यावेळी पोलिसांनी सदर गाडीवरील चालकाची चौकशी करता त्याने सांगितले की, आम्ही घरगुती वापराचे सिलेंडरमधुन ट्रान्सफर पाईपच्या तसेच एस. टी.बी मोटार संचाचे साहयाने लहान मोठया कमर्शिअल (व्यवसायीक) सिलेडरमध्ये गॅस भरून भरलेल्या कमर्शीयल टाक्या हॉटेल व्यवसायकांना विक्री करत असतो. त्याच्याकडून घरगुती वापराच्या एस.पी कंपनीच्या ७० गॅस टाक्या सिलेंडर गॅसने भरलेल्या व एक मारूती सुझुकी कॅरी गाडी असा एकुण सुमारे ८,१५,००० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. पोलिसांनी निखील अनिल चांदगुडे यास ताब्यात घेवुन त्यांला बारामती येथील न्यायालयात हजर केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी हे करीत आहेत.